http://www.maayboli.com/node/25277 ह्या, दिनेशदा ह्यांच्या मूळ लेखात मला हे प्रकाशचित्र पाहायला मिळाले.
"बाओबाबचा वृक्ष हे आफ्रिकेचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही टिपलेले प्रचिही सुंदर चौकटीतले परिपूर्ण चित्र आहे. म्हणून, मला ते माझ्या http://srujanashodha.blogspot.com/ ह्या अनुदिनीवर लावण्याची इच्छा आहे. अनुमती द्यावी ही विनंती." ह्या माझ्या विनंतीला, "नमस्कार नरेंद्र, परवानगी दिली. -दिनेशदा. हे उत्तर मिळाले, आणि मी बाओबाबला अधिकृतरीत्या इथे आणण्यात यशस्वी झालो.
दिनेशदा हल्ली आफ्रिकेत कार्यरत आहेत. मायबोली डॉट कॉमवर वृक्षवल्लींचे आणि पाककृतींचे व्यासंगी जाणकार अशी त्यांची ओळख आहे. भरपूर प्रवास, सुरेख प्रकाशचित्रण आणि सुरस चित्तवेधक वर्णने ह्यांमुळे त्याचे लेख वाचनीय असतात. ह्या अनुमतीखातर दिनेशदा यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
हे विशालकाय वृक्ष उत्तर भारतातही सर्वदूर आढळतात. इथे त्यांना गोरख चिंच म्हणून ओळखले जाते. मोठी वांगी किंवा लहान दुधी भोपळ्याच्या आकाराची व पिकलेल्या चिंचेच्या रंगाची साल असलेली ही फळे चिंचेपेक्षा फिकट आंबट-गोड चवीच्या घट्ट गराने भरलेली असतात. मी इंदोरला गेलो असता हे वृक्ष मांडू किल्ल्याच्या परिसरात पाहिल्याचे आठवते. तिथे रस्त्यावर ह्याची फळेही विकत होते. ह्याच्या खोडात भरपूर पाणी मिळते. ही खोडे हत्तींची खूप आवडती मेजवानी असतात. बाओबाब वृक्ष हा सृष्टीचा एक चमत्कारच आहे.