२०१५०३२३

रसाची पोळी

http://www.maayboli.com/node/53186 ह्या दुव्यावर, मायबोली डॉट कॉम ह्या संकेतस्थळावरील व्यक्तिरेखा ’मनीमोहोर’ उपाख्य हेमा वेलणकर ह्यांनी ’रसाच्या पोळ्यां’ची पाककृती सादर केलेली आहे. मुळात ही संकल्पनाच स्वादिष्ट. त्यात बैजवार सविस्तर पाककृती दिलेली. त्यानंतर तयार झालेल्या देखण्या ’रसाच्या पोळ्या’ही सुबक सजावटीसह पेश केलेल्या.

प्रकाशचित्रही अगदी खरेखुरे सौष्ठव अभिव्यक्त करणारे. हे सगळे पाहून मला तर खूपच आनंद झाला. सृजनाचे एवढे सुंदर स्वरूप आपलेसे करण्याची मनीषाही झाली. मग मी त्यांना अनुमतीच मागितली. त्यांनीही ती आनंदाने दिली. म्हणूनच ती रसाची पोळी इथे विद्यमान आहे. त्याखातर त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. त्यांच्या अशाच उत्तमोत्तम कलाकृतींना भरपूर प्रकाश लाभो हीच प्रार्थना. अर्थातच ही पोळी पाहून जसा मी तिच्या प्रेमात पडलो, तसेच तुमचेही काही झाले तर नवल वाटायला नको!

हलकी खरपूस, मधुर खुसखुशित, आमरसाची पोळी ।
तबकात सुबक ती, सजवली सुंदर, चंपकपुष्पे रचली ॥
मनीमोहोर खरोखर, पाककृतीवर, लट्टूच रसना झाली ।
नववर्षाची भेट अलौकिक, अवचित आज मिळाली ॥

पाककृती सुंदर म्हणावी का फोटोग्राफी, की सजावटीस शंभर मार्कस द्यावेत ह्या संभ्रमातच मी अजूनही आहे.

२०१४०५१७

लाजरू शेकरू

“लाजरू शेकरू” http://www.maayboli.com/node/48998 ह्या मायबोली डॉट कॉम वर लिहिलेल्या एका लेखात श्री.साईप्रकाश बेलसरे ह्यांनी शेकरूची सुरेख प्रकाशचित्रे प्रकाशित केलेली आहेत. “डिस्कव्हर सह्याद्री” http://www.discoversahyadri.in/2014/05/ShyShekaru-IndianGiantsquirrel.html ह्या त्यांच्या अनुदिनीवरही हा लेख पाहता येईल. ह्या लेखात, महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानला गेलेला 'शेकरू' (Indian giant squirrel) हा लाजरा-बुजरा प्राणी, त्यांनी चहु-अंगांनी सुरेख चित्रित केलेला आहे. अतिशय सुरेख शेकराचे, निवांत प्रकाशचित्रण करण्याची संधी त्यांना सुदैवाने मिळाली आणि त्यांनी तिचे चीज केले. वन्य, शाखारोही प्राण्यांच्या चपळ हालचालींहूनही सत्वर हालचाली करून, जी दृश्ये टिपावी लागतात, त्या कलेतील त्यांचे उपजत कौशल्य आणि चपळताही ह्या प्रकाशचित्रांतून प्रच्छन्नपणे व्यक्त होत आहे. शेकरूच्या स्वरूपातील ईश्वरी सृजन आणि त्यांचे प्रकाश-चित्रणातील हे अनोखे सृजन पाहून मन प्रसन्न झाले. ह्या लेखात त्यांनी यू-ट्यूबवरील प्रकाशचित्रणाचा दुवाही दिलेला आहे. त्यावरील प्रकाशचित्रणही निव्वळ देखणे असेच आहे.



ते लिहितात, “”दुपारची वेळ. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता. अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी. हा प्राणी, चक्क महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानला गेलेला 'शेकरू' होता. खरंतर, "असुरक्षित प्रजाती" म्हणून घोषित असलेला शेकरू, म्हणजे सह्याद्रीच्या जैववैविध्याचं प्रतिकंच! शेकरू हा 'खार' प्राणिगटात येतो. गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते. भीमाशंकर - महाबळेश्वर आणि सह्याद्री पश्चिम घाटात शेकरू आढळतात. शेकरूच्या निवांत दर्शनाने मन एकदम एकदम प्रसन्न झालं. जणू आमचा सह्याद्रीचं पावला.”



ह्या अनुदिनीवर ही चित्रे पुन्हा प्रकाशित करण्यास त्यांनी अनुमती दिली आहे. त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. त्यांनी असाच निसर्ग पाहत राहावा. असेच त्यास चौकटीत बसवावे! स्वतः आनंद मिळवावा, इतरांसही असाच वाटून द्यावा, ह्याकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा !!

२०१३०८०३

क्रोशाची कप-बशी




चहा घ्या, चहा घ्या,
चहा सौख्यकारी ।
चहा प्राशिताची,
मना ये उभारी ॥

अशी ख्याती असलेला चहा आपण रोजच पीत असतो.

मात्र “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात” असावा त्याप्रमाणे,
केवळ नजरेला दृश्यमान होणार्‍या कप-बशीतील चहा नजरेनेच प्राशन करावा, ह्या उद्देशाने,

सुबक, देखणी, नयनमनोहर, कपबशी विणली छान ।
क्रोशाची ती कलाकुसर, वर‌ दोर्‍यांची नक्षी महान ॥
शुभ्र, गुलाबी, रंग विखुरते, कलेस अंत न पार ।
कडा उठून त्या बशीही सजली, कपास डौल अपार ॥

अशा प्रकारची अद्‍भूत कपबशी विणली आहे मायबोली डॉट कॉम वरील व्यक्तीरेखा ’अवल’ उपाख्य आरती खोपकर ह्यांनी. कपबशीचे प्रकाशचित्र इथे पुन्हा प्रकाशित करण्यास अनुमती दिली, एवढेच नव्हे तर त्याकरता वेगळ्याने कष्ट घेऊन सुरेख प्रकाशचित्र उपलब्ध करून दिले म्हणून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. मला जसे हे सृजन आवडले, तसेच तुम्हालाही नक्कीच आवडेल!
.

२०१३०५०८

आंबा



फळांचा राजा आंबा. मग तो पिकलेला असो, की कैरी, तोंडात चव चव रेंगाळते ती भारीच. ही प्रकाशचित्रे मायबोली डॉट कॉम वरील व्यक्तीरेखा ’रंगासेठ’ उपाख्य श्री.सागर तहसिलदार ह्यांच्या "आंबापुराण" ह्या लेखातून त्यांच्याच अनुमतीने घेतलेली आहेत. आंबापुराण ह्या दुव्यावर तो मूळ लेख वाचता येईल.

सागर ह्यांचा लेख मुळातच वाचण्यासारखा, सुरस, औचित्यपूर्ण आणि सुंदर चित्रांनी परिपूर्ण आहे. मला जसा तो आवडला आहे तसा तुम्हालाही नक्कीच आवडेल. त्यातील चित्रे इथे आणण्यास अनुमती दिल्याखातर त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. तसेच अशा नितांतसुंदर लेखांकरताही त्यांना हार्दिक शुभेच्छा!

मेंदूच्या रंध्रारंध्रात चढत जाऊन व्यक्तीचा संपूर्ण ताबा घेण्याचे सामर्थ्य असलेली हापूसची चव, ही महाराष्ट्राने जगाला दिलेली एक अपूर्व देणगी आहे. आंब्याच्या चवीसारखेच सरस स्वभाव घडवावेत, अशी प्रेरणा त्यापासून आपणा सगळ्यांना मिळो हीच प्रार्थना!!


२०१३०४२७

किर्केनेसचे स्नो हॉटेल





मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर ’इस्पिकचा एक्का’ ह्या नावाने लिहिणार्‍या व्यक्तिरेखेने, तिथे उत्तमोत्तम, सचित्र, प्रवासवर्णने मोठ्या बहारदार शैलीत लिहिलेली आहेत. ’उत्तर धृवीय प्रदेशाची सफर’ ह्या त्यांच्या विख्यात प्रवासवर्णनातील ही प्रकाशचित्रे इथे त्यांच्याच अनुमतीने पुन्हा प्रकाशित करत आहे. अनुमतीखातर इस्पिकचा एक्का ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

’किर्केनेसचे स्नो हॉटेल’ http://www.misalpav.com/node/24282 ह्या त्या सफरीतील नवव्या भागात, ’इग्लु’ सारख्या एका हॉटेलातील त्यांच्या निवासाचे अद्भूत वर्णन वाचायला मिळते. वरच्या चित्रात हॉटेलचे प्रवेशद्वार दिसत असून, खालील चित्रांत, आतील भिंतींवर बर्फात केलेली कोरीव शिल्पे दिसत आहेत.

’इस्पिकचा एक्का’ ह्यांची प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. त्यांची वर्णने वाचून पर्यटनाची मनोवृत्ती घडत जाते. त्यांच्या प्रभावी प्रवासवर्णनांचा मी चाहता झालेलो आहे. तुम्हालाही ती नक्कीच आवडतील. अशाच उत्कंठावर्धक पर्यटनांकरता, त्यांच्या वर्णनांकरता आणि चित्तवेधक प्रकाशचित्रांकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा!

२०१३०२२१

स्वर्गीय नर्तक




स्वर्गीय नर्तक किंवा इंडियन पॅरॅडाइज फ्लायकॅचर हा पक्षी, सृष्टीच्या पक्षी जगतातला एक अत्यंत विलोभनीय आविष्कार आहे. माझ्या मते तरी याचे, स्वर्गीय नर्तक हे मराठी नावच त्याला जास्त शोभते.

तो उडताना त्याच्याबरोबरच त्याचा दोन-पिशी, लांबलचक शेपटा, मागे लाटांसारखे नर्तन करत समांतर फडकवत फिरतो. उडतानाच्या त्या पिसांसोबतचा त्याचा फोटो, खरे तर व्हिडिओ, कुणाकडे असेल असे मला वाटत नाही. मात्र असेल तर तो व्हिडिओ अविस्मरणीय ठरेल.




स्वर्गीय नर्तकाची एक सुंदर जोडी आम्हाला कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये दिसली होती. कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये आम्ही फिरत होतो नेमके त्याच दिवशी तिथे प्रचंड धुळीचे वादळ आलेले होते. पाऊस येईल की काय अशी परिस्थिती होती. कँटरमधून अत्यंत हताश अवस्थेत पुढे जात असता अचानकच ह्या पक्ष्यांची एक जोडी दिसली. आणि अशी काही लाटांसारखी शेपटीची पिसे तरंगवत ती जोडी पळाली, की त्या दृश्यानेच, आमच्या एरव्ही विफल झालेल्या सहलीचे सार्थक झाले होते.

वरील फोटोंचे चित्रण श्री. चैतन्य खिरे ह्यांनी केलेले आहे. इथे पुन्हा प्रकाशित करण्यास त्यांनी अनुमती दिली त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. तसेच ही अनुमती मिळवून देणार्‍या मायबोली डॉट कॉम वरील व्यक्तिरेखा ’अवल’ ह्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद. पहिला फोटो नर्तकाचा आहे तर दुसर्‍यात, डावीकडून अनुक्रमे, त्याचे पिल्लू आणि मादी दिसत आहेत.

चैतन्य खिरे ह्या त्यांच्या संकेतस्थळावरही अनेक सुंदर सुंदर प्रकाशचित्रे आहेत. मला जशी ती आवडली तशीच तुम्हालाही नक्कीच आवडतील असा विश्वास वाटतो. श्री. खिरेंचे प्रकाशचित्रण कौशल्य खरोखरीच अपवादात्मक आनंद देणारे आहे. त्यांना असेच सुंदर, नेत्रदीपक प्रकाशचित्रण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!