२०११०२१४

व्यावसायिक दिमाख

http://www.maayboli.com/node/23496 या दुव्यावरील श्री.विशाल कुलकर्णी यांच्या "कर्नाळ्यात भेटलेले दोस्त ..." या लेखातून हे प्रकाशचित्र पुन्हप्रदर्शनार्थ इथे घेतले आहे. अर्थातच त्यांच्या अनुमतीने.

ते म्हणतात हा पोपट "प्रोफेशनल पोझर" आहे. त्याचा दिमाखही आहे तसाच "व्यावसायिक" आणि हो, प्रकाशचित्रणकर्ताही अगदी "व्यावसायिक" आहे हे तुम्हाला चित्रावरून सहजच पटले असेल.

लहानपणी मी एक अन्योक्ती पाठ केलेली होती,

फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे । हिरेजडित सुंदरी कनक पंजरी तो वसे ॥
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे । स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे ॥

मात्र, इथे तर तो स्वतंत्र वनवृत्तीच्या पूर्ण दिमाखात विराजमान आहे.
कुठे पक्षाला कैद करणारे ते राजे-महाराजे आणि कुठे त्याला प्रकाशचित्रात कैद करणारा विशाल!
तुलनाच होऊ शकत नाही.

पोपटाच्या स्वतंत्र वनवृत्तीचा दिमाख हे ईश्वराचे सृजन असेल तर,
त्या दिमाखाचे दिमाखदार चित्र आपणांस सादर करण्याचे सृजन विशालचे आहे.
घन्य तो पोपट, धन्य विशाल आणि धन्य आपण सारे,
ज्यांना हे सारे सृजनाचे कौतुक डोळाभरून पाहता येत आहे. 

वनातील स्वातंत्र्य, आरोग्य ह्याचे । शुकासारखे, पूर्ण वैराग्य ह्याचे ॥
पुरा बाक चोचीस, कंठा विराजे । कसा रोखुनी चित्रकारास वेधे ॥

1 टिप्पणी:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

नमस्कार आणि मन:पूर्वक आभार काका ! मी काढलेल्या प्रकाशचित्राचा एवढा सुंदर उपयोग कुणी करु शकेल असे कधी वाटलेच नव्हते. त्यासाठी नरेंद्रकाकाच व्हावे लागते. :)एवढेच म्हणेन "मोगॅंबो खुश हुवा!"
आणि हो यापुढे माझ्या सर्व प्रकाशचित्रांचे अधिकार तुमच्या स्वाधीन करत आहे. हवे तसे वापरा ! पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार :)