२०११०२१०

सांधण दरी की रौद्र सह्याद्री !

http://www.maayboli.com/node/23253

या दुव्यावरील "सांदण दरी-एक निसर्ग-नवल" या श्री. डोंगरवेडा यांनी लिहिलेल्या लेखात सोबतचे प्रकाशचित्र दिलेले आहे. त्यांच्या अनुमतीनेच ते इथे पुन्हा प्रकाशित करत आहे.

सह्याद्री पर्वताचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी साम्रद नावाचा एक आदिवासीपाडा आहे.  तिथून चालत १०/१५ मिनिटात आपण एका घळीच्या मुखाशी पोहोचतो. तेच सांधण दरीचे मुख आहे. विशेष म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब, जमिनीला पडलेली भेग आहे.

घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. एक सोपा कातळटप्पा उतरुन आपण दरीच्या नाळेत प्रवेश करतो. दरीचे वळण आत सापासारखे लांबच लांब दिसते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय अरुंद नाळ आहे. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी बंदिस्त झालेली.

पहिला कातळ्टप्पा उतरताच एक पाणसाठा आपला मार्ग अडवतो. साधारण १.५ फूट खोल आणि १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने पार व्हावे लागते.  मग तीव्र उतार सुरु होतो. नाळ अधिकाधिक अरूंद होते. कुठेही सपाट मार्ग उरत नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरशः तिथे खच पडलेला दिसतो. मग एक मोठा पाणसाठा मार्ग अडवतो. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी, तर दुसर्‍या बाजूला ३ फूट खोल पाणी. हेही पाणी कधी आटत नाही, कारण सूर्यकिरण इकडे पोहोचूच शकत नाहीत. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा, असे डोंगरवेडा यांनी तिथे लिहून ठेवलेले आहे.

नाळेतूनच प्रवास चालतच राहतो. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३०/४० मिनिटे लागतात. दोन्ही बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.

सह्याद्रीची ही अशी रौद्रता अनुभवायची तर मग सांधण दरी पाहायला हवी! नाही का?
.

1 टिप्पणी:

mannab म्हणाले...

सांधण दरी की सह्याद्रीची रौद्रता ? या आपल्या अनुदिनीवरून मी मूळ अनुदिनीवरील लेख वाचला. हा पदभ्रमंतीचा अनुभव घेण्या जोगा निश्चित आहे. धन्यवाद.