मानवी जीवनात सृजनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सृजनाच्या शोधाने केवळ जीवनाचा अर्थच उमजतो असे नव्हे, तर जीवनातला आनंदही प्राप्त करता येतो. म्हणूनच, निसर्गनिर्मित सृजनाचा आणि मानवनिर्मित सृजनाचा घेतलेला शोध अभिव्यक्त करणारी ही अनुदिनी. हा सृजनाचा शोध जसा मला आनंददायी ठरला, तसाच तुम्हालाही सुरस वाटेल.
२०११०४२५
गोरख चिंच
http://www.maayboli.com/node/25277 ह्या, दिनेशदा ह्यांच्या मूळ लेखात मला हे प्रकाशचित्र पाहायला मिळाले.
"बाओबाबचा वृक्ष हे आफ्रिकेचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही टिपलेले प्रचिही सुंदर चौकटीतले परिपूर्ण चित्र आहे. म्हणून, मला ते माझ्या http://srujanashodha.blogspot.com/ ह्या अनुदिनीवर लावण्याची इच्छा आहे. अनुमती द्यावी ही विनंती." ह्या माझ्या विनंतीला, "नमस्कार नरेंद्र, परवानगी दिली. -दिनेशदा. हे उत्तर मिळाले, आणि मी बाओबाबला अधिकृतरीत्या इथे आणण्यात यशस्वी झालो.
दिनेशदा हल्ली आफ्रिकेत कार्यरत आहेत. मायबोली डॉट कॉमवर वृक्षवल्लींचे आणि पाककृतींचे व्यासंगी जाणकार अशी त्यांची ओळख आहे. भरपूर प्रवास, सुरेख प्रकाशचित्रण आणि सुरस चित्तवेधक वर्णने ह्यांमुळे त्याचे लेख वाचनीय असतात. ह्या अनुमतीखातर दिनेशदा यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
हे विशालकाय वृक्ष उत्तर भारतातही सर्वदूर आढळतात. इथे त्यांना गोरख चिंच म्हणून ओळखले जाते. मोठी वांगी किंवा लहान दुधी भोपळ्याच्या आकाराची व पिकलेल्या चिंचेच्या रंगाची साल असलेली ही फळे चिंचेपेक्षा फिकट आंबट-गोड चवीच्या घट्ट गराने भरलेली असतात. मी इंदोरला गेलो असता हे वृक्ष मांडू किल्ल्याच्या परिसरात पाहिल्याचे आठवते. तिथे रस्त्यावर ह्याची फळेही विकत होते. ह्याच्या खोडात भरपूर पाणी मिळते. ही खोडे हत्तींची खूप आवडती मेजवानी असतात. बाओबाब वृक्ष हा सृष्टीचा एक चमत्कारच आहे.
३ टिप्पण्या:
साधारण सात-आठशे वर्षांपूर्वी, गुलाम म्हणून समुद्रमाग्रे िहदुस्थानात आणल्या गेलेल्या काळ्या हबशी मजुरांच्या सोबत आपल्याकडे आलेला बाओबाब ऊर्फ गोरखचिंच या बहुगुणी झाडाबद्दल लिहावं तेवढं कमीच. ‘कुणी हजारो र्वष जगू शकतं का हो’, या प्रश्नाचं उत्तर मी ‘हो’ असं देते तेव्हा लोक हसतात. कुणालाही अतिशयोक्ती वाटेल, पण बाओबाब ऊर्फ गोरखचिंच पृथ्वीवर जिवंत असलेला आणि जिवंत राहणारा सर्वात जुना जीव आहे. पूर्व आफ्रिका हे माहेरघर असलेला हा महावृक्ष आजमितीस बेचाळीस देशांमध्ये आढळतो. मिशेल अॅडनसन या फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ नामकरण केला गेलेला हा महावृक्ष, ‘अॅडनसोनिया डिजिटाटा’ या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखला जातो. भारतात याला गोरखचिंच म्हणण्यामागचे कारण, गोरखनाथांनी या वृक्षाखाली बसून शिष्यांना उपदेश केला होता असं सांगीतलं जातं. बाकी चिंच आणि या फळाचा दूरान्वयेही संबंध येत नाही. आपल्याकडे आढळणाऱ्या काटेसावरीच्या ‘बॉम्बॅकेसी’ कुळात याची गणना होते. आकाराने प्रचंड असलेल्या बाओबाबचा बुंधा अगदी दहा मीटर्सचा व्यास गाठू शकतो. बाओबाब आपल्या अंगावर प्रचंड फांद्या मिरवत नाही, पण पानझडी प्रकारात गणला जाणारा हा महावृक्ष हिवाळ्यात आपली सगळी पानं गाळतो नि अगदी बोडका होऊन जातो. या दांडगोबाला अनेक वर्षांनी उन्हाळ्यात फुलं येतात. ही फुलं एकेकटी, पांढरी नि हातभर मोठी असतात. बाओबाबची उग्र वासाची फुलं संध्याकाळी उमलतात तेव्हा जणू पांढरे आकाश दिवेच वाटावे अशी दिसतात. यातून पुढे येणारं फळ, अर्थात गोरखचिंच, हे पोपटी हिरवट रंगाचं असतं. साधारण वीतभर मोठय़ा होणाऱ्या फळाच्या आत पांढरट गरात काळपट बिया असतात. या बिया रुजायला खूप अवघड असतात नि अनेक महिनेही लावतात. कारण यावर असलेलं आवरण कठीण असतं. असं हळूहळू मोठं होणारं झाड, नीट जगलं तर हजारो र्वष डौलात उभ राहतं. आजच्या घडीला, आफ्रिकेत दोन-अडीच हजार वष्रे जुनी बाओबाब झाडं आहेत. आफ्रिकेत या बाओबाबला जीवनवृक्षच मानतात. याची फळं ही सर्वोत्तम ऊर्जास्तोत्र मानली जातात. याच जोडीला, याच्या बुंध्यांचा वापर चक्क हजारो लिटर्स पाणी साठवण्यासाठी केला जातो. राहण्यासाठी, बसचे थांबे म्हणून, हॉटेल्स व दारूचे गुत्ते म्हणूनही या झाडांच्या बुंध्यांचा वापर केला जातो ही गंमतच आहे नाही? आजमितीस, आपल्याकडे आंध्र प्रदेशातल्या, गोवळकोंडा किल्ल्यात असलेलं बाओबाब, भारतातलं सर्वात जुनं बाओबाब झाड म्हणून ओळखलं जातं. साधारण सातशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या झाडाला ‘हातीयों का पेड’ असं संबोधलं जातं. आपलाकडे, अनेक राज्यांमध्ये शंभरी उलटून गेलेल्या गोरखचिंचेच्या झाडांना स्मारकांचा, अर्थात हेरिटेज मॉन्युमेन्ट्सचा दर्जा दिला गेला आहे. अशा या लििव्हग लिजंडबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. एकदा तरी हा बाओबाब जवळून पाहावा असाच असतो. महाराष्ट्रात, मुंबई, वसई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा, वाई या शहरांमध्ये हे वृक्ष आहेत. मध्य प्रदेशात, नर्मदेच्या किनारी तर चक्क बनं आहेत यांची. आपल्या अनेक पिढय़ांशी संवाद साधलेल्या या महावृक्षाला एकदा तरी जरूर अनुभवा.( Reference -From article in Loksatta
हेच गोरख चिंचेचे फळ आम्ल पित्तावर गुणकारी आहे. चांगले पिकलेले फळ निवडावे निवड या फळाचे वरील कवच नारळा प्रमाणे थोडे जाड असते. यामध्ये लालसर तांबूस रंगाच्या बिया असतात त्यावर आंबट चवीची पूड असते फळ पिकल्यावर आतील ह्या बिया सुकून फळ हलविल्यास आवाज करतात असे फळ निवडावे यातील बिया एकत्रितपणे हातात रगडल्यास पूड वेगळी होते त्यातील धागे वेगळे करावेत पुडीच्या प्रमाणात एकास एक सुंठ पावडर मिसळावी व दुप्पट दळलेली साखर मिसळावी हे एक चमचा मिश्रण दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर घ्यावे सुमारे अर्धा तास काहीही खावू नये आम्ल पित्तात उपयोग होतो
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद. दोन्हीही प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहेत. - नरेंद्र गोळे
टिप्पणी पोस्ट करा