२०११०८१८

कोकिळा



ही आहे कोकिळा. मायबोली डॉट कॉम वरील यो-रॉक्स यांनी, ती त्यांच्या घरातील खिडकीतून चित्रित केलेली आहे. त्यांच्या अनुमतीनेच ती इथे पुन्हा प्रदर्शित करत आहे. त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद! यो रॉक्स हे पट्टीचे भटके असून पदभ्रमणांवर लिहिलेले त्यांचे एकापेक्षा एक अत्यंत सुरस, सचित्र लेख  मायबोली डॉट कॉम वर आढळून येतात. ते मुळातच वाचायला हवेत एवढे ते चांगले आहेत. 

कोकिळा तांबूस डोळे, राखाडी पाय आणि पांढर्‍या ठिपक्या ठिपक्यांनी नटलेल्या काळ्या-करड्या शरिरामुळे वेधक दिसते. ती कावळ्याच्या घरट्यात अंडी टाकून त्यांच्याकडूनच उबवून घेते अशी वदंता आहे. मात्र, जगप्रसिद्ध कोकिळेचा आवाज हा प्रत्यक्षात कोकिळेचा नसून, कोकिळाचा असतो. साधारणतः एवढ्याच शरीरयष्टीचा आणि कावळ्यागत घट्ट काळ्या रंगाचा कोकिळ, गातो मात्र सुरेल. खरे तर ते गायन असते वरील कोकिळेच्या रंजनार्थ. आपण ऐकतो आणि प्रसन्नही होतो हा एक अनपेक्षित लाभच म्हणावा लागेल.

कोकिळ काय किंवा कोकिळा काय दिसतात मात्र फारच क्वचित. एरव्ही हिरव्या कंच वृक्षराजीतून कुहूक येताच कितीही माना उंचावून पाहा, सतत कुहू कुहू करत राहणारे हे पक्षी सहजी दिसत मात्र नाहीत. त्यांची कुहूक अख्खे वातावरणच भारित करून टाकते. हूल देत राहते. अशा कोकिळेला प्रत्यक्षात पाहून तिचे अत्यंत जवळून चित्रण करणारे यो, केवळ भाग्यवानच नव्हेत तर कुशल प्रकाशचित्रक आहेत हे वेगळ्याने सांगायची मुळी आवश्यकताच नाही. वरील चित्रच पुरेसे बोलके आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: