२०११११२७

ईश्वरी कला



हिर्‍यांचे हार
या दुव्यावर "सर्वसाक्षी" म्हणजे श्री.बळवंत कृष्ण पटवर्धन यांनी लिहिलेला "हिर्‍यांचे हार" हा लेख वाचनात आला. त्यातले दव-बिंदूंनी सजलेले सुंदर कोळ्याचे जाळे, मनातही घर करू लागले. म्हणून मी पुढील कविता लिहिली.

गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे ।
सावज तयात यावे, आशा मनात पाळे ॥ धृ ॥

थंडीत पहाटेच्या दव, साखळून आले ।
सावज बनून थेंबही, जाळ्यात कैद झाले ॥ १ ॥

अडकून बिंदू शतशः, झुंबर तयार झाले ।
कोवळ्या उन्हात तेजे चमकून रत्न झाले ॥ २ ॥

ते रत्नहार सारे, जाळ्यास भार झाले ।
चिंतीत कोळी झाला, सावज फरार झाले ॥ ३ ॥

मग रत्न-पारखाया, एक “सर्वसाक्षी” आला ।
दृश्यास जोखणारा, एक जवाहीरा मिळाला ॥ ४ ॥

उकलून एक एक, पृथक पदर पदर केला ।
दवबिंदू एक एक, जणू सुट्टा हिराच केला ॥ ५ ॥

जरी रत्नहार भासे, धागा गहाळ झाला ।
त्या “ईश्वरी”१ कलेचा, चित्रात कळस झाला ॥ ६ ॥
.
१. “ईश्वर”च “सर्वसाक्षी” म्हणवतो, नाही का!
.
- नरेंद्र गोळे २०११११२७
.
सर्वसाक्षीजींनी त्यावर खालील प्रतिसाद दिला.
.
.
"Submitted by सर्वसाक्षी on Sun, 27/11/2011 - 10:08.
नरेंद्रजी, अप्रतिम कविता! सहज सुंदर काव्य.
.
सर्वसाक्षी - म्हणजे ईश्वर हे खरे पण माझा हे नाव घेण्यामागचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपला 'साक्षीभाव' सतत जागृत असावा, जे जसे आहे ते तसे ग्रहण करावे त्यात पूर्वग्रह वा स्वतःच्या पसंतीचा, सोयीचा कल नसावा म्हणजेच आपल्याला जे दिसले ते तसेच सर्वांना सांगावे, आणि सदसदविवेकबुद्धी कायम जागृत असावी ही भावना.
.
माझ्या चित्रासाठी इतकी सुरेख कविता दिल्याबद्दल आभार. एक विनंती - आपली ही कविता आपल्या जालनिशीवर अवश्य द्या आणि त्यात यापैकी कुठलेही वा सर्वच चित्रे खुशाल द्या."

ह्या विनंतीलाच आज्ञा समजून मी त्या जाळ्याचे एक नमुनेदार चित्र वर पुन्हा प्रकाशित केले आहे. मला आवडले तसे तुम्हालाही नक्कीच आवडेल. तरीही मूळ लेखातली इतर सुंदर चित्रे पाहायला मुळीच विसरू नका. पाहिलीत, तर तुम्ही काय गमावले असतेत ह्याचा विचार करू शकाल.

1 टिप्पणी:

mannab म्हणाले...

जसे छायाचित्र तशी उत्स्फूर्त कविता. याहून मी काय लिहावे ? धन्यवाद.

मंगेश नाबर.