२०१२०४१३

पनामा कालवा



पनामा कालवा  ह्या लेखात, मायबोली डॉट कॉम वरील एक व्यक्तीरेखा वर्षूनील ह्यांनी पनामा कालव्यास दिलेल्या भेटीचे तपशीलवार, उत्तम प्रकाशचित्रांनी अलंकृत प्रवासवर्णन केलेले आहे. जहाज प्रवासांचा खूप मोठा फेरा वाचवणारा हा कालवा १५ ऑगस्ट,१९१४ रोजी दळणवळणासाठी खुला झाला. तेव्हापासून तो जगातले जणू एक मानवनिर्मित आश्चर्यच ठरलेला आहे.

त्या लिहितात, या कालव्याच्या कल्पनेचा जन्म पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकं इस्थुमस ऑफ पनामा मधे दाखल झाले, तेंव्हा झाला. इस्थुमस ऑफ पनामा ला अटलांटिक आणि पॅसिफिक या दोन्ही महासागरांचे सर्वात अरूंद भाग आहेत ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात आली ती एका स्पॅनिश, भटक्या खलाशी, 'बलबोआ' ला. या जागी कालवा खोदला तर अटलांटिकहून पॅसिफिकला जायला ८,००० नॉटिकल मैल इतकं अंतर कमी होईल आणि त्यामुळे इंधनाची ही बचत होईल, याशिवाय उत्तर अमेरिकेला जाताना, जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या सदर्न टोकाच्या केप हॉर्नला पूर्ण वळसा घालून जावे लागत असे. या भागात समुद्री चाच्यांचा सुळसुळाट होता,  कालव्यामुळे हा प्रश्न ही कायमचा सुटणार होता.

कालव्याचे महत्व जाणून, तो बनवण्याचे दिशेने प्रयत्न स्पॅनिश, ब्रिटिश आणि शेवटी १८८० मधे फ्रेंचांनी सुरु केले. पण या भागात घनदाट पर्जन्यवने होती. त्यांच्यामुळे किडे, डास इ. भरपूर मात्रेत असल्याने विभिन्न रोग पसरत. मजूर पटापट रोगाला बळी पडत. शेवटी मजूर, पैसा या सगळ्यांची कमतरता पडू लागली आणि कालव्याचे काम पुन्हा बंद पडले. १९०३ मध्ये, अमेरिकेच्या मदतीने पनामा, कोलंबिया पासून वेगळा झाला आणि एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मग अमेरिकेने कालव्याचे काम आपल्या हाती घेतले. अश्याप्रकारे या कालव्याच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप यायला ४०० वर्षांचा दीर्घ काळ लागला.

अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा, ८० किलोमीटर लांबीचा हा कालवा बनवण्याकरता, पनामा सिटीतून पनामाच्या एका डिस्ट्रिक्ट कोलोन कडे वाहणार्‍या 'छाग्रेस' नदी वर दोन जागी बांध घालून दोन मोठाले तलाव निर्माण करण्यात आले. छाग्रेस नदी समुद्रपातळीपासून अडीचशे फूट उंचावर आहे. ही जगातील एकमेव नदी आहे जी अटलांटिक आणि पॅसिफिक या दोन्ही मसागरांमधे विलीन होते. त्यांवर तीन लॉक्सचे समांतर संच बांधण्यात आले, मीराफ्लोरेस्, पेड्रो मिगल आणि गातून. यापैकी मीराफ्लोरेस लॉक्स, पनामा सिटीपासून वीस मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे अटलांटिक सागर आहे, तर गातून लॉक्सच्या पलीकडे पॅसेफिक सागर आहे. पॅसिफिक सागराची पातळी अटलांटिक पेक्षा वीस सेंटीमीटर आधिक उंच आहे. या लॉक्स मधे तलावाचे पाणी ग्रॅव्हिटी चे तत्व वापरून भरले जाते. प्रत्येक लॉक मधे १,०१,००० मीटर क्यूब पाणी भरले जाते." या लॉक्स मुळे या कालव्या मधे जहाज समुद्रपातळीपासून वर उचलले जाते आणि अट्लांटिक कडून गातून लॉक्समधे आल्यावर हळूहळू पाण्याची पातळी कमी करत करत, पुढे गातून सरोवरामधून प्रवास करुन पेड्रो-मिगेल लॉकमधून मीराफ्लोरेस लेक मध्ये जाते व मीराफ्लोरेस लॉक्समधून दुसर्‍या बाजूला अटलांटिक महासागरात अलगदपणे प्रवेश करते. याचप्रमाणे याच्या ऊलट अटलांटिक कॅनल मधे प्रवेश करणारे जहाज मीराफ्लोरेस लॉक्स, मीराफ्लोरेस लेक, पेड्रो-मिगेल लॉक्स, गातून लेक, गातून लॉक्स असा प्रवास करत करत गातून लॉक्समधे पोचले कि दारं उघडून त्या बाजूने पॅसेफिक प्रवेश करते.

हा कालवा संपूर्ण पार करण्यासाठी जहाजाच्या आकारमानाप्रमाणे ८ ते १० तासांचा वेळ लागतो. वर्षाकाठी १४,००० + शिप्स या कालव्यातून जातात. हा कालवा पास करण्याकरता, एका जहाजाला सरासरी २,८०,००० अमेरिकन डॉलर फी द्यावी लागते. आत्तापर्यन्तची सर्वात जास्त फी  ' कोरल प्रिंसेस'  नावाच्या क्रूज शिपने भरलेली आहे. २००२ मधे या क्रूजशिप ने ३,८०,५०० अमेरिकन डॉलरची  घसघशीत फी दिली होती, तर १९२८ मधे रिचर्ड हेलिबर्टन या अमेरिकन स्विमरकडून कॅनाल पोहून जाण्याकरता केवळ ३६ सेंट्सची फी आकारलेली होती. पुढच्या वर्षी या कालव्याला शंभर वर्षं पूर्ण होतील. मनुष्याची काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती (ingenuity), धैर्य, साहस या गुणांची ग्वाही, हा कालवा दिवसरात्र देत असतो.

(आत्ताचे लॉक्स ११० फूट रुंदीचे आणि १,०५० फूट लांबीचे आहेत त्यामुळे आजची नवीन शिप्स त्यातून पास होऊ शकत नाहीत. पण आता नवीन कालव्याचे बांधकाम आधीच सुरु झालंय. नवीन लॉक्स ५५ मीटर रूंद आणि ४२७ मीटर लांबीचे असणार आहेत. जवळपास चार फुटबॉल मैदानांच्या आकाराचे.)

त्या कालव्याचे सर्वांगांनी काढलेले सुरेख फोटो पाहण्याकरता मूळ लेख अवश्य वाचावा. इथे वरील प्रकाशचित्र व त्यासंबंधित माहिती पुन्हा प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याखातर वर्षूनील ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद. त्यांनी असेच अपूर्व प्रवास करावेत आणि अत्यंत अनोखी माहिती आपल्याला सुपूर्त करावी, ह्याकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: