२०१२०४१०

लिंगोद्भव शिवप्रतिमा




कसबा पेठेतील प्राचीन शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिरातील हे प्रकाशचित्र आहे. मिसळपाव डॉट कॉमवरील व्यक्तिरेखा वल्ली ह्यांनी ते काढलेले आहे. हेरीटेज पुणे: त्रिशुंड गणपती मंदिर ह्या त्यांच्या लेखातून, त्यांच्या अनुमतीनेच इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. अनुमतीखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. तसेच पुढील अशाच प्रकाशचित्रणार्थ हार्दिक शुभेच्छा!

हे त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. वल्लींनी ह्या सुंदर शिल्पाकृतींनी नटलेल्या सुरेख मंदिराचे, चोखंदळपणे निवडलेले आणि अत्यंत कौशल्याने चौकटबद्ध केलेले फोटो मला बेहद्द आवडले. मूळ दुव्यावर आपणही अवश्य पाहावेत. आम्ही अनेकदा पुण्यास जातो. मात्र कधीही कुणी याबद्दल बोलल्याचे ऐकलेले नाही.

मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत.

पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. ब्रम्हा हंसाचे रूप घेऊन वरच्या बाजूस अंत शोधायला गेला, तर विष्णूने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. कुणालाही कसलाही थांग लागेना. विष्णू थांग लागत नाही म्हणून परत आला. ब्रम्हा परत येऊन थांग लागला असे खोटेच सांगू लागला. तेव्हा शिवाने रागावून ब्रम्हदेवाच्या पूर्वी पाच (चारही दिशांना चार आणि ऊर्ध्व दिशेला एक) असलेल्या शिरांपैकी ऊर्ध्व दिशेच्या शिराचा शिरच्छेद केला.

असेच एक शिल्प मी वेरूळच्या लेण्यांत पाहिल्याचे मला आठवते. वरील कथा मी तिथेच मार्गदर्शकाकडून ऐकलेली आहे.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: