२०११०१२६

चिलिका सरोवर

कटक या ओरिसाच्या जुन्या राजधानीच्या शहरापाशी, महानदी अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराकडे झेपावू लागते. त्यातला सगळ्यात दक्षिणेकडील फाटा चिलिका सरोवरात परिणत होतो. चिलिका सरोवर भारतातले सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. अशाप्रकारे महानदीच्या मुखाशी त्रिभूज प्रदेश तर आहेतच, शिवाय साडेअकराशे वर्ग किलोमीटर विस्ताराचे भव्य चिलिका सरोवर आहे. चिलिका सरोवर उत्फुल्ल होऊन वाहू लागते आणि सागराची वाट शोधते. दोन मुखांशी जाऊन ह्या शोधाचे समापन होते.

उत्तरेचे मुख आहे जुने आणि दुसरे दक्षिणेकडले मुख आहे नवे. इसवी सन २००० पूर्वी हे नवे समुद्रमुख नव्हते. २३ सप्टेंबर २००० रोजी ते उघडण्यात आले. त्याची कहाणी अशी आहे. काळाच्या ओघात जुन्या समुद्रमुखाशी गाळ साठत गेला. मुख अरुंद होत गेले. उथळ होत गेले. मग चिलिका सरोवराची पातळीही उंचावत गेली. गावे पाण्याखाली बुडू लागली. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवू लागली. या समस्येवर इलाज शोधला जाऊ लागला.

पुण्याच्या केंद्रिय पाणी आणि शक्ती संशोधन स्थानक (Central Water and Power Research Station), यांच्या शोधाचे फलित म्हणून असा निष्कर्ष काढण्यात आलेला होता की कायलातील (कायल = lagoon = उडिया भाषेत हृदो) क्षार आणि लाटांचे ओघ (flux), कायलाचे मुख (mouth of the lagoon), मुख्य कायलाच्या जवळ आणल्याखेरीज सुधारणार नाहीत. त्यांच्या, त्रिमिती आकडेशास्त्रीय प्रारूप (3-dimentional numerical prototype) अभ्यासाच्या आधारे, त्यांनी शिफारस केली की १०० मीटर रुंद आणि कायलातील कमीत कमी जल-पातळीच्या २. ५ मीटर खालच्या पातळीवर एक नवे मुख निर्माण करायला हवे. म्हणजे कायलातील क्षारांशाचा ओघ ४०% पर्यंत सुधारेल आणि कायलातील लाटांचा ओघ ४५% पर्यंत सुधारू शकेल. यामुळे कायलातील पर्यावरण-प्रणाली पुनः संजीवित होऊन अपेक्षित क्षारांशाची पातळी -म्हणजेच उन्हाळ्यात उत्तर भागातील क्षारांश लाखात १. ५ भाग- साध्य करता येईल.

यानुसार नवे कायलमुख सिपकुड गावाजवळ २३ सप्टेंबर २००८ रोजी समुद्रास खुले करण्यात आले. हे, केंद्रिय पाणी आणि शक्ती संशोधन स्थानक, पुणे व समुद्र अभियांत्रिकी केंद्र (Ocean Engineering Centre), भारतीय प्रौद्योगिकी संस्था (Indian Institute of Technology), चेन्नई यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली साध्य करण्यात आले. राष्ट्रीय समुद्रतळ-आलेखन संस्था (National Institute of Oceanography), गोवा, यांनी कायलातील परिवर्तनांची देखरेख केली.

२००१ मध्ये चिलिका सरोवरातील बेटांवरची व आसपासची खेडी पुरप्रभावित झाली नाहीत. नंतरच्या दोन-तीन वर्षांत खेकड्यांचे उत्पादन १०-१५ पटींनी वाढले व सरोवरातील क्षारांश दुपटीने वाढला. शिवाय जुन्या समुद्रमुखातून होणाऱ्या क्षीण जलौघापायी, ५०, ००० हेक्टर जमिनीवरील खरीफाच्या पीकांचे होणारे नुकसान, नवे समुद्रमुख उघडताच थांबले. ही उपलब्धी चिलिका विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नमूद केलेली आहे.

अशाप्रकारे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित सृजनाचा अद्भूत आविष्कार ठरले आहे चिलिका सरोवर. याची सविस्तर माहिती माझ्या महानदीचे मुख या प्रवासवर्णनात दिलेली आहे. ती अवश्य वाचावी.
.

२ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

प्रिय नरेंद्रजी यांस,
स.न.वि.वि.
आपल्या चिलिका सरोवरावरील लेखावरून मला महाराष्ट्रातील विशाल अशा लोणार या खा-या पाण्याच्या सरोवराची आठवण झाली. आपला हा लेख मला आवडला.आपण या संबंधात लिहिलेला लेख "महानदीचे मुख" हे प्रवासवर्णन कुठे वाचता येईल त्याचा खुलासा करावा. मला तेथे जाण्याची संधी मिळाली तर जाता येईल.
मंगेश नाबर

नरेंद्र गोळे म्हणाले...

धन्यवाद नाबर साहेब!

वरील लेखात जिथे "महानदीचे मुख" असे लिहिले आहे, तोच दुवा आहे. त्याच्यावरच टिचकी मारली असता, तो दुवा माझ्या लेखावर घेऊन जाईल.

ते ही न साधल्यास माझ्या "नरेंद्र गोळे" या अनुदिनीच्या उजव्या बाजूस विषयवार अनुक्रमणिका दिलेली आहे. तिथल्या योग्य त्या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही त्या लेखाप्रत पोहोचू शकता.