रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग १ लेखकः मदनबाण या लेखावरील एका प्रतिसादात "पैसा" ह्यांनी सादर केलेली ही रांगोळी मला आवडली. "ही रांगोळी आणि प्रकाशचित्रही अत्यंत वास्तव आणि सुबक आहे. मला माझ्या सृजनशोध ह्या अनुदिनीवर लावायला आवडेल. मिळू शकेल काय?" अशी मी विचारणा केली. ज्योति कामत "विचारून सांगते" म्हणाल्या. मग त्यांनी "ही मूळ रांगोळीच्या फोटोची लिंक आहे. रांगोळी खूप मोठी होती आणि मी फोटो मोबाईलवर काढले होते, त्यामुळे २ तुकड्यात होते, पण हा फोटो स्वतः कलाकाराने काढला आहे. तुम्हाला पाहिजे तर ब्लॉगवर वापरू शकता, फक्त त्याचं नाव द्यायला विसरू नका! त्यांचे नाव श्री.नरेश माणगावकर." अशा शब्दांत अनुमती मिळवून दिली! म्हणून आता ही रांगोळी इथे सहर्ष प्रस्तुत करत आहे.
ज्योति कामत ऊर्फ मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावरील "पैसा" यांच्या ऑफिसातल्या श्री.नरेश माणगावकर नावाच्या कलाकाराने लतादीदी पणजीच्या कला अकादमीत आल्या होत्या तेव्हा काढलेली ही रांगोळी आहे. मला ती उत्कृष्ट सृजनाचा नमुना वाटली. धन्य ते चित्रकार, धन्य चित्र उपलब्ध करून देणारे आणि ही कला चक्षुर्वैसत्यं पाहणारे, पाहू शकणारे आपणही धन्यच! तुम्हालाही ती नक्कीच आवडेल असे वाटते. अशा अद्वितीय कलाकृतीस होईल तितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. त्यात मलाही वाटा उचलता येतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. त्याकरता ज्योतीताईंचे आणि माणगावकरांचेही अनेक आभार!
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा