२०१२०१०३

सत्यम्‌-शिवम्‌-सुंदरम्‌

मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावरील व्यक्तीरेखा “स्पा”, यांनी माझे गाव हा लेख लिहीला आणि तो माझ्या वाचनात आला. खरे तर असे गाव कित्येकांचे असू शकेल. मात्र ज्या ज्या गोष्टी वास्तव (सत्यं), पवित्र (शिवं), सुंदर (सुंदरम्‌) वाटाव्यात, त्या त्या सर्व गोष्टींचा आलेख तपशीलवार काढावा तसा तो लेख, मला वाटला. त्या लेखातील उदात्त स्मृतींच्या सान्निध्यात सतत राहावे असे मला वाटू लागले. असेही वाटले की असे सुंदर घर, गाव सोडून लोकं डोंबिवलीत येऊन राहूच कशी शकतात? असो. मग मला असे वाटू लागले की, त्यातील काही संस्मरणीय प्रकाशचित्रे माझ्याजवळ, माझ्या संग्रहात असायला हवीत. मला नसले तसले घर तर काय झाले, त्याच्या सुखाची छाया तर मी बाळगू शकतो ना! त्यावर मी “स्पा” म्हणजे प्रसन्न आपटेंना तसे विचारलेच. तेही अगदी सहजच हो, म्हणाले. म्हणून ही प्रकाशचित्रे इथे आहेत.



ती वृंदावनीच्या पायतळीची वीट, अन्‌ सारवलेली, सुरेख, सुंदर नीट ।
रेखले त्यावरी प्राजक्ती स्वस्तिक, स्वस्थचित्त मी झालो नतमस्तक ॥ १ ॥



परसात बहरली हिरवी प्रसन्न बाग, ती छोटी झुडुपे धरून सजला काठ ।
देठास अननसा धरून सजले झुडुप, यापरते स्वागत कुठले देऊन गुच्छ ॥ २ ॥



हा रम्य किनार्‍यावरला तारा मासा, रुप सतेज त्याचे, सर्वांगावर काटा ।
देखणा शुभ्र तो, वाळूत सजलेलासा, कोवळ्या उन्हात निवांत बसलेलासा ॥ ३ ॥



पदचिन्ह तयाचे वाळूत उठले खास, ते टिपून चौकट-बद्धच केले त्यास ।
हे प्रकाशचित्र, शोभे प्रसन्न-सृजन, वालुका-चित्र जणू मनास देते आस ॥ ४ ॥




मृदू किती मुळातच, टोचे वाळूकण, रक्षणास त्याने रचले कवच कठीण ।
वाढता वाढता, फिरला, झाला शंख, झळकतो चमकतो रंगछटांत सुरेख ॥ ५ ॥

प्रसन्न आपटे ह्यांचे हे सृजन मला आवडले. भावले. तुम्हालाही नक्कीच आवडेल!
इथे ही प्रकाशचित्रे पुन्हा प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याखातर प्रसन्ना यांना मनःपूर्वक धन्यवाद!!

२ टिप्पण्या:

Dream Engine म्हणाले...

काका... तुमचेही मनापासून आभार//
तुम्ही रचलेल्या समर्पक ओव्या तर फारच छान

तुमच्या संग्रहात अशीच उत्तरोत्तर वाढ होत राहो , हीच ईश चरणी प्रार्थना

BinaryBandya™ म्हणाले...

सुंदर ...