हे प्रकाशचित्र श्री.गिरीश कुलकर्णी ह्यांच्या “पेट्रा” ह्याच नावाच्या मायबोली डॉट कॉम वरील लेखातून घेतलेले आहे. इथे पुन्हा प्रकाशित करण्यासाठी दिलेल्या अनुमतीखातर त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
त्यांचा मूळ लेख आणि त्यातील प्रकाशचित्रे तर आश्चर्यचकित करून टाकणारी आहेत. भारतात जशी पुरातन काळात शिल्पकला बहरास आलेली होती, तशीच शिल्पकला रोमन साम्राज्यातही होती. डोंगराच्या पोटात घरे खोदून वसवलेल्या ह्या शहराने त्याचे प्रत्यक्ष प्रमाणच मिळते. भव्य, दिव्य, चिरंतन आणि देखणे.
बीबीसीने, "मृत्यू येण्यापूर्वी ज्या ४० जागा माणसानं पाह्यला हव्यात" अशांत ही जागा असल्याचे म्हटले आहे. तर युनेस्कोने पेट्राला “मानवाच्या सर्वात अमूल्य सांस्कृतिक वारशांपैकी एक” असा खिताब बहालही करुन टाकलाय!
जॉर्डनची राजधानी अम्मानपासून मृत समुद्र सुमारे दीड तासांच्या अंतरावर आहे. "मृत समुद्र" हे तसं एरव्ही अगदी रुक्ष वाटाव अस ठिकाण. येशू ख्रिस्त बापटाईज झाला म्हणून ही जागा ख्रिश्चनांसाठी अतिशय महत्वाची मानली जाते. मृत समुद्रापासून सुमारे तीन तासांच्या अंतरावर आहे “पेट्रा”.
पेट्रा हे ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकातलं शहर आहे. हे ठिकाण एका स्विस प्रवाश्याला १८१२ मध्ये सापडले. इथल्या अप्रतीम वास्तुरचनेमुळे अन इथल्या जलव्यवस्थापनाच्या पद्धतीसाठी ते जगभर प्रसिद्ध झालय! डोंगराच्या कपारीतून चालत असतांना अचानक अस काही भव्य दिव्य एकदम समोर येईल अशी कुठलीही कल्पना नसतांना आपण अचानक सोबतच्या चित्रातल्या या रोमन चमत्कारासमोर येऊन उभे राहातो.
आता पेट्राबद्दल माहिती सांगायची तर शब्द अपुरे पडतात. मात्र त्या शहराचे सुरेख वर्णन जॉन विल्यम बरगॉन यांच्या न्यूडिगेट-पारितोषिकप्राप्त कवितेत केलेले आहे. ती कविता अशी आहेः
“It seems no work of Man's creative hand,
by labour wrought as wavering fancy planned;
But from the rock as if by magic grown,
eternal, silent, beautiful, alone!
Not virgin-white like that old Doric shrine,
where erst Athena held her rites divine;
Not saintly-grey, like many a minster fane,
that crowns the hill and consecrates the plain;
But rose-red as if the blush of dawn,
that first beheld them were not yet withdrawn;
The hues of youth upon a brow of woe,
which Man deemed old two thousand years ago,
match me such marvel save in Eastern clime,
a rose-red city half as old as time.”
आणि तिचा मराठी अनुवाद आहे असाः
" माणसाने घडलेले हे वाटतच नाही
कल्पनेच्या तरंगांवर कष्टांची कला ही
कुठल्याशा जादूने कातळात कोरली
चिरंतन, पवित्र, सुंदर, परात्पर ही
डोरिक देवळागत शुभ्रवर्णही नाही ही
पवित्र दैवी कार्ये नाहीत, परंपरा ही
संत-संगतीचा करडा रंग नाही जरा
पठाराच्या टेकडीवरला मुकुटच खरा
उषेच्या लाजण्याचा, गुलाबी हा रंग
कातळाने घेतला, का सोडेल तो संग
आर्जवी शिल्पावर यौवनाची आशा
हजारो वर्षांची जणू मानवी मनीषा
पौर्वात्य कलेत असे आश्चर्य दाखवा
कालार्ध वयाचे गुलाबी शहर दाखवा "
आपल्याला जयपूर माहीतच आहे. मात्र ते बांधले आहे सवाई जयसिंहाने १७२७ ते १७३३ या केवळ सहा वर्षांत आणि त्यात आहे जगातील एकमेवाद्वितीय अवकाशीय वेध घेणारी प्रयोगशाळा "यंत्रमंदिर" म्हणजेच "जंतर-मंतर".
असे असले तरीही "पेट्रा"च्या अद्वितीय असण्याचे महत्त्व काही कमी होत नाही. तेव्हा ते समजून घेण्याकरता कुलकर्णींचा मूळ लेख अवश्य वाचा. जमल्यास जाऊन प्रत्यक्ष अनुभवा. मलाही असा योग प्राप्त झाल्यास मी स्वतःला भाग्यवानच समजेन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा