२०१३०२१५

वल्लरी



घनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड ह्या मायबोली डॉट कॉम वरील एका लेखात श्री. हेमंत पोखरणकर ह्यांनी एका सुंदर ट्रेकची माहिती सचित्र दिलेली आहे. त्यातीलच हे एक प्रकाशचित्र, त्यांच्याच अनुमतीने इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. अनुमतीखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

मात्र ह्यावरून, प्रणव सदाशिव काळे ह्यांच्या “कुठे म्हणालो परी असावी” ह्या गझलेतील एक शेर आठवला. तो शेर, “तरूस आधार होत जावी, अशी कुणी वल्लरी असावी “ असा आहे. तरूला आधार देऊ शकेल असा वेल, वल्लरी. ह्या प्रकाशचित्रात तशाच वर्णनाची; पण सशक्त, स्वावलंबी वल्लरी आपण पाहू शकतो. तिच्या अंगातील पीळ कुठल्याही वेलीच्या सौष्ठवाचे एक अलौकिक उदाहरण म्हणता येईल असा सृजनाचा नमुना आहे.

श्री. हेमंत पोखरणकर ह्यांच्या अशाच अनेक रोमहर्षक पदभ्रमणांची सुरस वर्णने तुम्हाला त्यांच्या “हेमंत” ह्या अनुदिनीवरही वाचायला मिळतील. ती वर्णने मला जशी आवडली आहेत, तशीच तुम्हालाही आवडतील असा विश्वास वाटतो.
.

२०१२१२१४

इंद्रवज्र



पावसाळ्याच्या आसपास डोंगर-उतारावर उभ्या असलेल्या माणसाच्या पाठीमागून सूर्यकिरणे येत असतील आणि समोरच्या उतारावर धुक्याचे वातावरण असेल तर त्या धुक्यात माणसाला संपूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसू लागते. ह्यालाच इंद्रवज्र म्हणतात. ह्या वर्तुळाच्या मध्यावर (केंद्रस्थानी) दिसते पाहत असणार्‍याचीच सावली. पाहणार्‍याने हात हलवले, तर ती सावलीही हात हलवत असते. हरिश्चंद्रगडावरून अनेकांनी, अनेकदा इंद्रवज्र पाहिलेले आहे.

असेच इंद्रवज्र सुमारे दोन वर्षांपूर्वी मायबोली डॉट कॉम वरील व्यक्तिरेखा ’हर्पेन’ म्हणजेच हर्षद पेंडसे ह्यांनी तोरण्यावर पाहिले. त्यांनीच काढलेले हे प्रकाशचित्र, त्यांच्याच अनुमतीने इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. अनुमतीखातर त्यांना अनेक धन्यवाद.

निसर्गाचा हा मनोहर आविष्कार त्यांना पाहता आला, एवढेच नव्हे तर प्रकाशचित्रात बंदिस्त करता आला हे त्यांचे सद्भाग्यच. मायबोली डॉट कॉमवर त्यांनी लिहिलेले मूळ लेख खालील दुव्यांवर पाहता येतील. ह्यासोबतच त्यांच्या सर्व सृजनात्मक प्रकल्पांना तसेच साहसी पदभ्रमणांना हार्दिक शुभेच्छा!

इंद्रवज्र
.
तोरणा - किल्ला, रानफुलं, इंद्रवज्र, वगैरे....
.
मेळघाट-१०० दिवसांची शाळा डिसेंबर २०११ ते मार्च २०१२
.
निवेदन-१०० दिवसांची शाळा - मेळघाटात स्वयंसेवक हवेत
.

२०१२०९१६

ईकोफ़्लो

नाशिकमधील सातपूरचे श्री.नरेन भिंगे



आणि त्यांनी निर्माण केलेला अद्वितीय पंप



एक हलका, ने-आण-सुलभ, मनुष्यचालित पाणी-क्षेपक (पंप); नाशिकमधील सातपूरच्या  श्री. नरेन भिंगे ह्यांनी तयार केला आहे.

ईकोफ्लो नावाचा हा क्षेपक केवळ १२ किलो वजनाचा असून, तासाभरात, २५ फूट (७ मीटर) खोल विहीरीतून पाणी खेचून ४५ फूट (१५ मीटर) उंचीवरील इमारतीत, २,००० ते ५,००० लिटर पाणी साठवू शकतो.

शून्य संचालन खर्च असलेला हा क्षेपक केवळ रु.२,५००/- मध्ये उपलब्ध असल्याची बातमी २००८ मध्ये प्रथम प्रस्तुत झाली होती [१]. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांनी ज्या वैतागवाडी गावास भेट देऊन त्यास आशाकिरण हे नाव दिले होते त्या गावाचा उत्कर्ष साधण्याचे काम ह्याच पंपाने केले होते.

सृजनशीलतेचा हा आविष्कार, सह्याद्री वाहिनीवरील “अतुल्य शोध” कार्यक्रमांतर्गत, “अभियंत्रज्ञदिनाचे” औचित्य साधून १५ सप्टेंबर २०१२ रोजी संध्याकाळी ६ वाजताचे सुमारास प्रसारित करण्यात आला.

व्यक्तीशः माझ्यातर्फे आणि खरे तर आपणा सर्व भारतीयांचे वतीने, ह्या “अतुल्य शोधा”करता नरेन भिंगे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सह्याद्री वाहिनीच्या ह्या पुढाकारासही माझ्या अनेकानेक  शुभेच्छा!

सुमारे ६० किलो वजनाच्या व्यक्तीने त्यावर उभे राहून चालवायचा हा क्षेपक असल्याने, सर्वोच्च कार्यक्षमता साधली गेलेली आहे. अशा अद्वितीय सृजनाचे आपणा सगळ्यांसच अपरूप वाटायला हवे. ह्या शोधाने गरीब शेतकर्‍यांना मोलाचे वरदान दिलेले आहे. अशाच आणखीही अपूर्व शोधांकरता श्री.भिंगे ह्यांना हार्दिक शुभेच्छा!

संदर्भः [१] प्रथम वार्ता

२०१२०८१०

गोगल गाय

मिसळपाव डॉट कॉम वरील “प्रबळ सौंदर्य” ह्या श्री.सौरभ उपासनी ह्यांच्या लेखातील ही प्रकाशचित्रे, इथे त्यांच्याच अनुमतीने पुन्हा प्रकाशित करत आहे. असे, संवेदना-ग्राहकांपासून तर थेट शेपटापर्यंत, नखशिखांत सर्व अवयवांचे यथास्थित दर्शन करवणारे, गोगलगायीचे प्रकाशचित्र तर मी आजवर पाहिलेलेच नव्हते.

वर अंबारीच्या शंखाचेही सम्यक दर्शन घडवलेले आहे. नागपूरला सीताबर्डीवर पूर्वी एक मूनलाईट फोटोस्टुडिओ असे. त्याचे ब्रीदवाक्य समोरच लिहिलेले असे. “इफ यू आर ब्युटिफूल वुई विल कॅच युअर ब्युटी, इफ यू आर नॉट, वुई विल मेक यू!” गोगल गायीलाही सौंदर्य देणारे हे फोटो आहेत. जसे मला आवडले, तसेच तुम्हालाही आवडतील असा विश्वास वाटतो. इथे प्रकाशनार्थ अनुमती दिली म्हणून सौरभ यांस हार्दिक धन्यवाद. तसेच अशाच उत्तमोत्तम प्रकाशचित्रणांकरता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रबळ सौंदर्य हा लेख मला आवडला. त्यातील प्रकाशचित्रे तर बेहद्द आवडली. त्यांच्या संबंधात ते म्हणतात “खरतर फोटोग्राफीची आवड जपताना ट्रेकिंगची आवड कधी लागली ते कळलच नाही!” म्हणजे मुळात ते कलाकारच आहेत. सृष्टीकडे पाहण्याची त्यांना उपजत दृष्टी आहे. त्यामुळेच त्यांची प्रकाशचित्रे एकाहून एक सरस आहेत.

 प्रबळगडावरून कलावंतीणीच्या बुरूजाचे त्यांनी काढलेले फोटोही त्यामुळेच अत्यंत प्रदर्शनीय असणार ह्यात शंका नाही. तेही आम्हाला पाहायला मिळोत ही प्रार्थना!

२०१२०७२५

कृष्णकमळ

शोभे पाठीस दश अवतारी,
पार्श्वभू  पाकळ्यांची ।
डोई टोपी शुभ्र मिरवते,
कौरवी त्या दळांची ॥
छत्री शोभे बहरत वरी,
पांडवांच्या तुर्‍यांची ।
डौले डोले कलश, त्यावरी,
देखणी रे त्रिमूर्ती ॥

कृष्णकमळाचे फूल हे ईश्वरी सृजनाचे एक अनोखे कौतुक आहे. उत्तम भूमितीय संरचना. देखणे रंगाविष्कार. मध्य कळ्याला खुडल्यावर उघडणार्‍या, सुघटित कुंभातील, सुमधुर मध. शिवाय दूरवर दरवळत असलेला मंद सौरभ. यापरता मानवी मनास मोहवणारे, खरे तर खुळावणारे, दुसरे फूल असू तरी शकेल काय? त्याच फुलाचे हे सुंदर प्रकाशचित्र चित्रित केले आहे मायबोलीवरील व्यक्तिरेखा अवल उपाख्य आरती खोपकर ह्यांनी.

त्यांनी मायबोली डॉट कॉम वर लिहिलेल्या “कृष्णकमळ” ह्या लेखातील हे चित्र इथे पुन्हा प्रकाशित केले आहे. व्यवसायाने इतिहास अध्यापन करत असलेल्या अवल, उपजत कलाकार असून त्यांना अनेक कलांत रुची आणि गती आहे. मायबोलीवरील त्यांचे लेखन, तसेच खालील त्यांच्या अनुदिनीही ह्याची साक्ष पटवतील.

१. कलेची अनुदिनी http://arati21.blogspot.in/
२. कवितांची अनुदिनी http://mayurapankhi.blogspot.in/
३. प्रकाशचित्रांची आणि संजीवित‌-चलचित्रांची अनुदिनी http://chitrarati.blogspot.in/
४. इतिहासावरील लिखाणाची अनुदिनी http://www.goshtamanasachi.blogspot.in/
५. पाककलेची अनुदिनी http://rasanaarati.blogspot.in/
६. आईची अनुदिनी http://www.rekhachitre.blogspot.in/
७. बाबांची अनुदिनी http://www.sureshchitre.blogspot.in/

ह्या चित्राच्या पुनः प्रकाशनास अनुमती दिल्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद! तसेच त्यांच्या सर्व भावी सृजनास हार्दिक शुभेच्छा!

२०१२०५२८

रक्तगुलाब


http://www.misalpav.com/node/21771 "फ्लोरा,फोटो, फोकस-भाग २ -पुष्पराज गुलाब"
ह्या लेखात मिसळपाव डॉट कॉम वर प्रथम प्रकाशित झालेले हे प्रकाशचित्र, तेथील व्यक्तीरेखा "चौकटराजा" यांनी, प्राधिकरण निगडी येथील पुणे महापालिकेच्या पुष्पप्रदर्शनात काढलेले आहे. त्यांच्या अनुमतीनेच इथे ते पुन्हा प्रकाशित करत आहे.

आधीच गुलाब. त्यात लाल रंगाचा. शिवाय पुष्पप्रदर्शनात सादर झालेला. वर चौकटराजांसारखे जाणकार प्रकाशचित्रकार चित्रण करणार. ह्या सगळ्या समसमा संयोगामुळे हे प्रकाशचित्र देखणे तर झालेच आहे आणि मन प्रफुल्लित करणारा ताजेपणाही त्यात पुरेपुर उतरला आहे. मला ते खूप आवडले आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. इथे ते पुन्हा प्रकाशित करण्यास अनुमती दिली म्हणून त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!